Monday, 28 March 2016

पुणे 52..😊

कधी कधी सिनेमा पूर्ण पाहिल्यावरसुद्धा आपल्याला काय आवडले ते लगेच सांगता येत नाही, त्यावर विचार करावा लागतो.. काही माहिती मिळवावी लागते आणि मग आपण एक कलाकृती म्हणून ओपन माईंड ने त्याकडे पाहतो...

पुणे - 52 सिनेमा आला तेव्हा आमची वेगळी लाइफस्टाइल असल्याने आजच्यासारखे वाटेल तेव्हा सिनेमे बघत नव्हतो... पण त्यात सई ताम्हणकरचे काही हॉट सिन्स आहेत असे "रसिक" मित्रांकडून  कळले होते म्हणून बघायचा होता.. पण तेव्हा priorities च्या लिस्ट मध्ये छंद नेहमीच शेवटी येत असल्याने हा सिनेमा पाहायचे राहून गेले...

आज युट्युबवर पाहिला आणि म्हटलं...वाह... बाकी काही सुचले नाही... मग यावर गुगल केले आणि कळले की फिल्म मेकिंगमध्ये noir नावाचा एक जॉनर (genre) आहे... ह्या प्रकारचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे..

देऊळ सिनेमा अजिबात न आवडल्याने गिरीश कुलकर्णीबद्दल एक अढी मनात होती पण ती पूर्ण दूर झाली...स्टोरी पेक्षा यात कलाकारांचे संवाद जास्त लक्षात राहण्यासारखे आहेत...

यातल्या प्रामाणिक पण अयशस्वी डिटेक्टीव अमर आपटे मध्ये बरेचदा आपण स्वतःलाच पाहिले असे वाटले... परस्त्रीचे आकर्षण वाटते पण आपल्या बायकोवर मनापासून प्रेम आहे या टिपिकल साच्यातल्या पुरुषाला त्याने फार सुंदर व्यक्त केले आहे... त्याच्या मनातला आवाज त्याला जसा अस्वस्थ करतो तसाच आपल्यालाही करत असतो पण आपण स्वतःला चकवण्यात व्यस्त असतो...

"कॅमेराचा वापर, सिनेमॅटोग्राफी वगैरे टेक्निकल गोष्टी आपल्या ह्याच्यावर... स्टोरी आवडली पायजेल..." असे आम्ही म्हणायचो.. पण त्यांचे महत्व आता लक्षात आले...
आणि असे म्हणणारे आम्ही "हे" होतो हे सुद्धा... हा हा हा

एक मैत्रीण तेव्हा म्हणाली होती की " पुणे 52 पाहिला नसशील तर नको पाहूस रे..एकदम भंगार आहे.."
तिला आता मेसेज करतो...;) हा हा

Friday, 25 March 2016

फसलेली क्रांती..😊

फसलेली क्रांती... (गानूकाकांच्या पोस्ट वरील कमेंट) #जुने_दिवस #RSM_Boys_Hostel

आमचे बांद्रा ईस्टला गव्हर्नमेंट कॉलनी मध्ये राजर्षी शाहू महाराज बॉयज हॉस्टेल होते... शिकणाऱ्या आणि वर्किंग क्लास मधल्या गरजू मुलांना स्वस्तात राहण्याची सोय तिकडे होती... पवार साहेबांनी 1978 साली ही संस्था चालू केली होती...

तिकडे कोळेकर नावाचे रेक्टर होते..ते हॉस्टेल ला आपले घर समजत आणि विद्यार्थ्यांना आपली मुले... आपुलकीने रागवत पण असत... नंतर नंतर असे झाले की आपले समजणे कमी आणि अपमान+रागावणे जास्त झाले...(माझ्या दुर्दैवाने मी याच फेज मध्ये 4.5 वर्ष काढले)

गरजू असल्याने सगळे अपमान मुले गिळत असत आणि तिकडेच राहत असत... रात्री 11 वाजता गेट बंद, सकाळी 6 पर्यंत जो आत तो आत आणि जो बाहेर तो बाहेर असा स्टेटस को असायचा.. हाफ पॅन्ट अलाऊड नाही, रूमवर इस्त्री वापरणे अलाऊड नाही... दारू सिगरेट तर अजिबातच नाही...सर मॅडमचा मुड खराब असल्यास कोणतेही कारण काढून रूम मध्ये येऊन अपमान होऊ शकतो...

बाहेर रिसेशन, भयंकर त्रासदायक असलेला सेल्स जॉब आणि आत हे...साधारण अशा वातावरणात आमच्यातला विद्रोह आकाराला येत होता..

एक दिवस म्हटलं... याच्या *** **, आज रूम वर बिअर आणायची.. कोण समजतो स्वतःला... 11 नंतर रिचवली आणि desired effect आल्यावर म्हटलं आता या रिकाम्या बाटल्या त्याच्या घरात फेकायच्या...पण ते नको असे ठरले...मग हॉस्टेलच्या entranceलाच एका टेबलवर ठेवायच्या असे ठरले...

त्यांचा एक खबरी आमच्याच फ्लोअरवर राहत असे... तो झोपलाय याची खात्री करून सगळ्या बाटल्या तिकडे ठेवल्या आणि मुद्दाम थोडी बिअर टेबलवर सांडली...

टेबलच्या मागे संस्थापक महोदयांचे चित्र, बाप्पा असे... दिवसा उदबत्ती लावून पवित्र होणार टेबल आज त्या धुरातून मुक्त झाला होता...

सकाळी 5.30 ला सगळ्यात आधी उठून गेट उघडताना ते पहिले जाईल याची खात्री करून आम्ही झोपलो..

पण आमच्या दुर्दैवाने चपराशाला हे कळले आणि त्याने आम्ही गेल्यावर टेबल साफ केला... 󾌹😢😢

कितीही अपमान झाले तरी त्या हॉस्टेल ने आम्हाला मुंबईत परवडेल असे छप्पर आणि स्वस्तात जेवण दिले... त्याबद्दल आपण त्यांचा ऋणी आहे..

मुंबईच्या उन्हाळ्यात रात्री/दुपारी बिना फॅनचे झोपणे, ढेकणाचे औषध मारल्यास भिंती खराब होतात म्हणून भयंकर उकाड्यात हँड gloves, सॉक्स आणि फुल पॅन्ट शर्ट घालून झोपायला आम्ही शिकलो फक्त हॉस्टेल मुळे...हिवाळ्यातही आंघोळीला गरम (कोमट) पाणी मागणे हा गुन्हा आहे हे आम्हाला तेव्हाच कळले..(ज्याने हे मागितले त्याला दुसऱ्या रात्री खोलीतून रस्त्यावर सामान फेकून हाकलले)...

या शिवाय हरयाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड अशा अनेक राज्यातील सुसंस्कृत (!!!) मुलांसोबत राहण्याचा अनुभव (?) आम्हाला दिला आणि आमचे 'कवळे' मन निब्बर झाले...😊 

स्थलांतर...

मराठवाड्यातला माणूस मुंबईला पहिल्यांदा आला की त्याला सगळीकडे समृद्धी आणि विकास दिसतो आणि तो हरखून जातो.. लोकलचा प्रवास त्याला exciting वाटतो, फोर्ट मधल्या DN रोडवर मिळणाऱ्या स्वस्त आणि मस्त गोष्टी पाहून त्याला वाटते हा तर स्वर्गच आहे... फोर्ट, नरिमन पॉईंट किंवा हिरानंदानी मधले ऐश्वर्य पाहून त्याला आपले आयुष्य लहान वाटू लागते..

गावच्या जत्रेतही होणार नाही इतकी गर्दी दादर आणि CST स्टेशनवर तो पाहतो आणि त्यात आपल्याला ही ट्रेन कशीही पकडायचीच आहे हे त्याला जाणवते आणि मग दुनियादारी कळते... या सुंदर शहराचे हिंस्त्र रूप मग हळूहळू उलगडत जाते आणि त्याला आपले ओसाड गाव सुंदर वाटू लागते आणि तिथले लोक सुद्धा अगदी प्रेमळ वाटू लागतात..

अजून काही काळ गेल्यावर (हा move on झाल्यावर) त्याला दोन्हीकडचे बेस्ट हवे असते...मुंबईची सॅलरी, लाईफस्टाईल आणि गावाकडचे निवांत कट्टे... पण होते भलतेच... मुंबईत असला की उपेक्षा आणि गावाकडे गेला की परकेपणा त्याच्या वाट्याला येतो...

अजून काही काळ गेल्यावर आपल्याला काहीतरी एकच निवडावे लागेल हे त्याला कळते पण त्यापासून तो दूर पळत असतो... अजून काही काळ जातो आणि मग मात्र तो शहर आहे तसे स्वीकारून जगायला शिकतो... नको ती comparison बंद होते आणि त्याच्यातले preconceived notions निघून जातात..अर्थात नवीन आत घेण्यासाठीच...

ज्या गोष्टी त्याला वाईट वाटत असतात त्यांची उपयुक्तता त्याला पटते आणि तो चालू लागतो...Stephen Covey म्हणतात तसे त्यानंतर तो जे आयुष्य जगतो ते त्याच्या निर्णयांचे फलित असते...

Sunday, 20 March 2016

आफ्रिदी, सायकोलॉजिस्ट आणि बदल... स्वैर विचार..


माझ्या एका मैत्रिणीच्या अंगावर वाशी ते सानपाडा दरम्यान ट्रेनच्या प्रवासात कोणीतरी पिशवीभर ह्यूमन वेस्ट फेकले. ती इतकी शॉक मध्ये होती की दादरला घरी टॅक्सी ने गेली.. ती पर्स आणि कपडे तिने परत कधीच वापरले नाहीत.. आपल्या अंगाला येणाऱ्या वासामुळे तिला स्वतःचा तिटकारा आला होता..

कांदिवली मध्ये 3 दिवसांपूर्वी एका मुलीच्या अंगावर कोणीतरी ऍसिड ने भरलेला फुगा फेकला..नशिबाने फक्त तिचे कपडे जळाले..
श्रीराम लागुंचा मुलगा ट्रेनच्या खिडकीत बसला असतांना बाहेरून दगड आला आणि त्याच्या कपाळावर लागला..त्यात तो गेला..एक मुलगी खाली पडून अपंग झाली..

प्लॅटफॉर्म वर चालत असतांना moving ट्रेन मधल्या एका मुलाने माझ्या पाठीत खूप जोरात झापड मारली..मी कळवळलो आणि तो माझ्याकडे पाहून हसत हसत गेला..पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यावर अर्धा तास येणारे अंधत्व मी अनुभवले आहे...

काल मॅच नंतर ओवेसी आणि आफ्रिदी ची आयमाय काढणारे लोक मला या सगळ्यांचेच भाऊबंधू वाटतात... यांच्या आयुष्यात प्रचंड निराशा आहे आणि हा संताप ते असा तिसऱ्याच माणसावर व्यक्त करतात.

सायकॉलॉजीस्टची आपल्याला फार गरज आहे असे वाटते. आमच्या जुन्या जॉब मध्ये ही सुविधा होती..तुम्ही त्यांना कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारू शकता.., ते आपले म्हणणे पूर्ण ऐकून घेतात आणि गरज वाटल्यास भेटायला येतात. आपल्याला मार्ग सुचवतात..यात मार्गदर्शकापेक्षा मित्रासारखा रोल असतो..

ज्या तरुणाईच्या आधाराने आपण महासत्ता वगैरे बनायच्या पोकळ गोष्टी करतो ते असे अन्सटेबल आहेत आणि बहुतांश लोकांना शॉर्टकट हवा आहे.. विशेष झीज न होता आपलेही सहज आयुष्य बदलावे असे खूप जणांना वाटते.

यातूनच मसीहाचा शोध घेतला जात असावा.."तुम्हीच आमचे  तारणहार" असे कोणाला म्हटले की आपली मेहनत वाचते आणि माणसाचा चमत्कारावर विश्वास सुद्धा दृढ होतो..
स्वतःचा नव्याने शोध घेऊन काही बदल घडवण्यापेक्षा आफ्रिदीच्या आईची ** म्हणणे लैच सोपे आहे... हा हा हा

टीप : मी काही गुणांचा पुतळा नाही. सोबतच्या मुलींना बऱ्याच प्रमाणात त्रास मी सुद्धा दिला आहे.. आपल्यालासुद्धा परीसस्पर्श होईल असे आम्हाला अगदी अलीकडे वाटत होते.. कारण काही असो पण एका जातीचा द्वेष सुद्धा आम्ही बराच काळ करायचो..

पण हे चूक आहे हे जाणवले..कदाचित उशीर झाला असला तरी आपण बदलणार हे नक्की..

सरकारी रुग्णालयात समुपदेशन केल्यास फरक पडेल असे वाट्ते.. अर्थात सगळे त्यांनी करायचे तर आम्ही मंदिरात घंटा हलवायची का? हाहाहा